
अहमदनगर | प्रतिनिधी
Sports: जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव लौकिक मिळवलेल्या चार खेळाडूंचा गौरव राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सोहळ्यात खेळाडूंना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी पालकमंत्र्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी शब्दांत त्यांचे मनोबल वाढवले. क्रीडा व युवक संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गौरवित खेळाडूंची माहिती खालीलप्रमाणे:
-
धनश्री हनुमंत फंड – बर्लिन (२०२४) येथील २० वर्षांखालील एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. बल्गेरियात होणाऱ्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी निवड.
-
सुजय नागनाथ तनपुरे – व्हिएतनाममधील आशियाई बीच रेसलिंग स्पर्धेत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक. ग्रीसमधील जागतिक स्पर्धेसाठी निवड.
-
प्रणिता सोमण – शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या या खेळाडूने चीन (२०२५) येथील एम.टी.बी. एशियन चॅम्पियनशिप मिक्स टीम रिलेमध्ये कांस्यपदक पटकावले. ती ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे.
-
वेदांत नितीन वाघमारे – पेरूतील ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेता. कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड.
जिल्ह्याच्या वैभवशाली क्रीडा परंपरेत भर घालणाऱ्या या खेळाडूंनी जागतिक स्तरावरही नवे विक्रम प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.