
अहमदनगर | प्रतिनिधी
Aaple sarkar: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवांबाबत नागरिकांचा थेट अभिप्राय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे ‘अभिप्राय कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार, हे कक्ष १ जुलै २०२५ पासून पाचव्या मजल्यावर कार्यरत आहे.
‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून नागरिकांना सेवा ठराविक कालावधीत व विहित शुल्कात मिळतात का, केंद्र चालकांकडून सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाते का, किंवा ठराविक शुल्कापेक्षा अधिक पैसे मागितले जातात का – या सर्व बाबींवर नागरिकांचा अभिप्राय घेणे हा कक्षाचा उद्देश आहे.
सध्या महसूल विभागाच्या अधिसूचित सेवांबाबत नागरिकांचा अभिप्राय गोळा केला जात असून, पुढील टप्प्यात जिल्हा निबंधक व मुद्रांक विभाग, महानगरपालिका, भू-अभिलेख विभाग यांच्या सेवांचा समावेश केला जाणार आहे.
या कक्षात १० ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, ०२४१-२३१००६१ या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांशी संपर्क साधून त्यांचा अभिप्राय नोंदवण्यात येत आहे.
‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर घेतलेल्या सेवेबाबत नागरिकांनी तक्रार किंवा सूचना असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा अथवा अधिकृत QR कोड स्कॅन करून अभिप्राय द्यावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे.