
मुंबई | प्रतिनिधी
Shivsena Demands: राज्यातील मंत्र्यांवरील गंभीर आरोप, भ्रष्टाचार व अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने राज्यातील काही मंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
शिष्टमंडळाने राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्य मंत्री योगेश कदम आणि मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणांची माहिती सादर केली. या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि असंवेदनशील वर्तनाचे आरोप असून, त्यांच्या कृत्यांमुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले.
निवेदनात हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पातील संभाव्य भ्रष्टाचार तसेच मीरा-भाईंदर महापालिकेतील भू-संपादन प्रक्रियेत झालेला गैरव्यवहार यासारख्या गंभीर विषयांचा समावेश होता. या सर्व प्रकरणांमुळे राज्य सरकारची विश्वासार्हता आणि प्रशासनाची प्रतिमा धोक्यात आल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर संबंधित मंत्र्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ बडतर्फ करावे, जेणेकरून शासनात पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली.
या वेळी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते.
शिवसेनेच्या या पावलामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.