
शेवगाव | प्रतिनिधी
Shevgav: केंद्र सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या व कामगार, कर्मचारी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ ९ जुलै २०२५ रोजी आयटक (AITUC), देशव्यापी कामगार संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाला शेवगाव (अहिल्यानगर जिल्हा) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेवगाव येथील पंचायत समितीपासून निघालेल्या मोर्चामध्ये आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, किसान सभेचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
या आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
- चार श्रम संहितांना त्वरित रद्द करावे
- रद्द केलेले पारंपरिक कामगार कायदे पुन्हा लागू करावेत
- महाराष्ट्र सरकारने जनविरोधी जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे
- सर्व असंघटित कामगारांसाठी ३०,००० रुपये किमान मासिक वेतन निश्चित करावे
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
- शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा
या आंदोलनात सहभागी झालेले नेते व कार्यकर्ते:
कॉ. सुभाष लांडे, कॉ. भगवानराव गायकवाड, कॉ. संदीप इथापे, कॉ. बबनराव पवार, कॉ. बापूराव राशिनकर, गोरख काकडे, भीवा घोरपडे, रामभाऊ लांडे, विष्णू गोरे, ॲड. भागचंद्र उकिरडे, ॲड. गणेश ताठे यांच्यासह आशा कर्मचारी संघटनेच्या अंजली भुजबळ, वैशाली देशमुख, रत्ना क्षीरसागर, गीता थोरवे, सुमित्रा महाजन, मंगल कोल्हे, आशा मगर, सुशीला गंगावणे, मंगल आहेर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे एकनाथराव वखरे, सुधाकर निळ, रामेश्वर लबडे, रमेश वाघमारे, लक्ष्मण ठोंबरे, अब्दुलभाई शेख हे उपस्थित होते.
“हे सरकार कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असून, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी कामगार कायदे रद्द करून हुकूमशाही पद्धतीने चार नव्या श्रम संहिता लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगारांचे मूलभूत हक्क डावलले जात आहेत.”
— कॉ. सुभाष लांडे