अहमदनगर | प्रतिनिधी
जिल्ह्यातील पोलिस सेवा अधिक प्रभावी, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ता. ३० जून ते ९ जुलै २०२५ या कालावधीत नागरिकांना पोलिसांच्या कामगिरीविषयी आपला अभिप्राय थेट ऑनलाइन देण्याची संधी देण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि सायबर गुन्ह्यांवरील पोलिसांचे कार्य या चार मुख्य विभागांवर नागरिकांना स्वतंत्रपणे आपले मत नोंदवता येणार आहे. यासाठी खास क्यूआर कोड व वेबसाईट लिंक (https://www.ahmednagardistpolice.gov.in/feedback-form) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे : फीडबॅक फॉर्म इंग्रजी किंवा मराठीत भरता येईल. नाव किंवा फोन नंबर देणे बंधनकारक नाही, मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे नाव नमूद करणे आवश्यक. ५० शब्दांत अभिप्राय नोंदवण्याची मुभा. एकूण जिल्हा पोलीस कार्यप्रणालीला १० पैकी रेटिंग देता येणार. प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे गुण (१ ते १०) देता येणार. सर्व अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार आहेत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांचा अभिप्राय आमच्यासाठी दिशादर्शक आहे. आपण दिलेला प्रत्येक अभिप्राय पोलीस व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतो.
हा उपक्रम नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद अधिक सशक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आपलाही अनुभव शेअर करा आणि जिल्हा पोलीस यंत्रणेचा भाग व्हा !
फीडबॅक लिंक : https://www.ahmednagardistpolice.gov.in/feedback-form
हे हि वाचा : पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली: भारताचा ‘बर्डमॅन’