
अहमदनगर | प्रतिनिधी
public issue: मुकुंदनगर व फकीरवाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्रेक झालेल्या नागरिकांनी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन देत येत्या गुरुवारी, १७ जुलै रोजी आयुक्तांच्या दालनात ‘कुत्रे सोडू आंदोलन’ छेडण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचारी व कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदारांकडून आंदोलकांवर किंवा कुत्र्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आंदोलनाला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय व तोफखाना पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच महिलांवर व वृद्धांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मुकुंदनगर परिसरात अनेकांना कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना घडत असून नागरिक भयभीत झाले आहेत.