शेवगाव | प्रतिनिधी
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी अखंड लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे निघालेला ताफा ता. 27 रोजी शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत सोहळ्यातून दणदणीत दुमदुमला.
कऱ्हेटाकळी येथे प्रवेश होताच गावागावांत कमानी, फ्लेक्सबोर्ड, घोषणाबाजी व जे सी बी तुन पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. खानापूर, घोटण, तळणी, शेवगाव शहर, क्रांती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तसेच पुढे वडूले, सामनगाव, मळेगाव, निंबेनांदूर, ढोरजळगाव या सर्व गावांत मराठा समाज व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या ताफ्यात लाखो समर्थक शेकडो-हजारो वाहनांसह स्वखर्चाने सामील झाले. मराठा समाजाचा हा अभूतपूर्व उत्साह पाहून मार्गावर जमलेल्या जनसमुदायाने ‘जय जिजाऊ-जय शिवराय’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमवले.
ताफ्याच्या व्यवस्थेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, पंचर व फिटर दुकानदारांची मोफत सेवा याची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
इतक्या प्रचंड गर्दी व हजारो गाड्यांच्या लांबलचक ताफ्यातही अहिल्यानगर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून शिस्त व सुरक्षितता कायम राखली. रात्र उशिरा ताफा पुढे रवाना झाला, मात्र समर्थकांचा उत्साह व स्वागत सोहळे अखंड सुरूच राहिले.
हा प्रवास एका नेत्याचा नव्हे तर मराठा समाजाच्या स्वाभिमानाचा प्रवास ठरला.
स्वयंसेवकांचा त्याग व परिश्रम.
आंदोलनाच्या ताफ्यात हजारो स्वयंसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले.
पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत, वाहन दुरुस्ती अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
कुठेही गर्दीची अडचण न होऊ देता त्यांनी शिस्तबद्धतेने वाहतूक सुरळीत ठेवली.
गावागावांत उभारलेल्या स्वागत कमानी, फ्लेक्सबोर्ड व पुष्पवृष्टीची व्यवस्था यामध्ये स्वयंसेवकांचा मोठा वाटा होता.
उष्म्याचा तडाखा असो वा रात्रभर चाललेली धावपळ – स्वयंसेवकांनी न थकता काम करत ताफ्याचे यशस्वी आयोजन केले.