
अहिल्यानगर | प्रतिनिधी
ahilyanagar: “आजच्या प्रगत महाराष्ट्राचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घातला. स्त्री शिक्षण व समाजसुधारणेच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचा विचार पिढ्यानपिढ्या पोहोचत राहील,” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
शहरातील माळीवाडा वेस येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच अभय आगरकर, अक्षय कर्डीले, सचिन जगताप, माणिकराव विधाते, नितेश भिंगारदिवे, माजी आयुक्त पंकज जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “राज्यातील महापुरुष व महान स्त्रियांमुळे समाज परिवर्तन घडले. त्यांचे विचार मार्गदर्शक ठरत आहेत. स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. शासन या विचारांना पुढे नेण्यासाठी स्मारके उभारण्याचे कार्य करत आहे. चौंडी येथे अहिल्यादेवींचे स्मारक ७०० कोटींचा निधी वापरून उभारले जात आहे. नायगाव येथे सावित्रीबाईंचे स्मारक १०० कोटी रुपयांत उभारले जात आहे. जिल्ह्यात अर्धाकृती पुतळ्यांना टप्प्याटप्प्याने पूर्णाकृती स्वरूप दिले जाईल.”
✨ स्मारकाची वैशिष्ट्ये –
- महात्मा फुले: १० फूट उंच, कास्यधातूचा पुतळा
- सावित्रीबाई फुले: ९ फूट उंच, कास्यधातूचा पुतळा
- लहान मुलीची मूर्ती: ४ फूट उंच, शिक्षणाचे प्रतीक
- एकूण वजन: सुमारे १८०० किलो
- भित्तीचित्रे: भिडे वाड्यातील ५ प्रेरणादायी दृश्यमालिका (स्त्री शिक्षण, सती प्रथा, हुंडा प्रथा, विषमता, जीवनदृष्य)
- पुतळा निर्मिती खर्च: ₹५०.६० लाख
- सुशोभीकरण खर्च: ₹४१ लाख