Grampanchayat karmachari: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतरही ठोस अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) यांच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयापासून मोर्चा सुरू झाला. या मोर्चात आयटकचे जिल्हा सचिव तथा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, राज्य सदस्य मारुती सावंत, कॉ. सतीश पवार, उत्तम कटारे, महादेव शेळके, विजय सोनवणे, बलभीम कालापहाड, दादा साळवे, गोरक्ष भावले, बाळासाहेब लोखंडे, सचिन कांबळे, विनोद कांबळे, आनंदराव शिंदे, नितीन काळे, संतोष घोरपडे, किशोर डाके, अशोक पालवे, भगवान फुलमाळी, अंबादास सपकाळ, आदिनाथ गीते आदी सहभागी झाले.
महासंघाने २० मेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिन्यात अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
प्रमुख मागण्या:
अभय यावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी
५४ महिन्यांपैकी केवळ १९ महिन्यांचा वाढीव फरक मिळाला, उर्वरित ३५ महिन्यांचे फरक दिले जावेत
नवीन किमान वेतन निश्चित करणारी समिती तातडीने गठीत करावी
उत्पन्न व वसुलीच्या अटी रद्द कराव्यात
सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना तिजोरीतून वेतन व १००% राहणीमान भत्ता द्यावा
आगामी आंदोलनांचे टप्पे:
८ ऑगस्ट – सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयांवर मोर्चा
१८ ऑगस्ट – सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांवर निदर्शने
८ सप्टेंबर – सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन