नेवासा | प्रतिनिधी
Crime: शनिशिंगणापूर देवस्थानातील बहुचर्चित अॅप घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अहिल्यानगर येथील सायबर क्राईम पथकाने थेट देवस्थानच्या कार्यालयात जाऊन स्थळ पंचनामा करत सविस्तर पाहणी केली. संगणक विभागासह संपूर्ण कार्यालयीन यंत्रणेची चौकशी करून प्राथमिक तपासासाठी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले.
सायबर पथकाने ट्रस्ट परिसरातील पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भागाचे व्हिडिओ शूटिंग केले असून, प्रत्येक विभागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. संगणक प्रणाली, नोंदी, ऑनलाइन दान व बुकिंग प्रक्रियेत झालेल्या अनियमितता, तसेच शनिदेवाला अर्पण होणाऱ्या तेलाची साठवणूक कशी व कुठे केली जाते, यासंदर्भातही सखोल माहिती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान ट्रस्टचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असून, त्यांच्या जबाबांची नोंद घेण्यात आली आहे. या चौकशीतून लवकरच महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेला तब्बल ५०० कोटी रुपयांचा ऑनलाइन अॅप घोटाळा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. लाखो भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांतील पारदर्शकतेअभावी संशय वाढत असून, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत यासंदर्भात दिलेल्या स्पष्ट घोषणेनंतर तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. सायबर पथकाकडून गोळा करण्यात आलेल्या माहितीचा सखोल तपास सुरू असून, लवकरच प्राथमिक अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ग्रामस्थ व शनीभक्तांमध्ये संतापाची भावना वाढत असून, “घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी एकमुखी मागणी होत आहे. तपासाची दिशा सध्या गोपनीय ठेवण्यात आली असून, पुढील कारवाई कोणावर होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.