अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar Sports: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 च्या आयोजनासाठी नियोजन बैठक व एकदिवसीय कार्यशाळा न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राजश्री शाहू सभागृहात उत्साहात पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील 565 क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रथमच महानगरपालिका व 14 तालुक्यांतील सर्व क्रीडा शिक्षकांची एकत्रित बैठक झाली.
बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. यावेळी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, भास्कर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, सहसचिव जयंत वाघ, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव, मनीषा पुंडे, अंजली देवकर, आप्पासाहेब शिंदे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रेसिडेन्शियल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. तर भास्कर पाटील यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाधिक शाळांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. दोन्ही विभागांनी एकत्रित नियोजनातून उच्च प्राथमिक शाळांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
2024-25 मध्ये यशस्वी आयोजन केल्याबद्दल तालुका क्रीडा प्रमुख, पर्यवेक्षक व पदोन्नत क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांचा गौरवही झाला.
दुपारी प्रवीण बानवलीकर यांनी वेबसाईटवर शाळांची नोंदणी, प्रवेशिका भरणे या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे यांनी 2025-26 मध्ये राबविण्यात येणाऱ्या 93 खेळप्रकारांची व तालुकास्तरावरील 10 प्रमुख खेळ आयोजनाची माहिती दिली. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादम्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्य योजनांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रथमच जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांसाठी आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गावडे यांनी, तर आभार भाऊराव वीर यांनी मानले.