अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar: गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालय शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी वारीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक दिंडी काढली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी रिंगण करून नृत्य सादर केले, ज्याला परिसरातील नागरिकांनी उभे राहून भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचा दुसरा भाग आनंदनगर परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पार पडला. येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सामील होऊन पारंपरिक फुगडी खेळली आणि भक्तिरसात न्हालो.
कार्यक्रमाची सांगता लापशीच्या प्रसादाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव किसन तरटे, ज्येष्ठ संचालक शरदकुमार झंवर, विश्वनाथ पोखरकर, मुख्याध्यापक रविंद्र अष्टेकर, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भक्तिमय उपक्रमाच्या यशामध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता.