Ahilyanagar Student Protest: चुकीच्या पेपर तपासणी पद्धतीविरोधात संस्थाचालक व विद्यार्थी एकवटले; परीक्षा परिषदेवर धडक मोहीम

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar Student Protest, परीक्षा परिषद

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Student Protest: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शासनाची अधिकृत स्वायत्त संस्था असून, परिषदेमार्फत राज्यातील जीसीसी-टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहँडच्या परीक्षा घेतल्या जातात. तथापि, परिषदेने बाहेरील खासगी कंपनीला परीक्षेचे काम सोपवले असून, त्या कंपनीकडून अपारदर्शक व मनमानी धोरणे राबवली जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संस्थाचालकांनी केलेल्या तक्रारीनुसार अनेक परीक्षा केंद्रांवर वीज, इंटरनेट, संगणक व प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असूनही परीक्षा घेण्यात येतात. तक्रार केली असता उपस्थित अधिकारी संगणकीय ज्ञानाअभावी कोणतेही प्रभावी उपाय करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका व पुनर्मूल्यांकनासाठी मोठी फी आकारली जाते. मात्र मिळालेली उत्तरपत्रिका खरंच संबंधित विद्यार्थ्याचीच आहे की नाही याची खात्री करता येत नाही. परिषदेकडे पडताळणीसाठी ठोस नियम वा पुरावे उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला.

Ahilyanagar Student Protest, परीक्षा परिषद

याशिवाय, परीक्षा परिषदेकडून अद्ययावत व सुरक्षित प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने डुप्लिकेट प्रमाणपत्रांचा धोका वाढल्याचेही सांगण्यात आले. मेहनती विद्यार्थी नापास तर कमी सराव असलेले विद्यार्थी जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे पालक व संस्थाचालकांनी निदर्शनास आणून दिले.

या अन्यायकारक पद्धतीविरोधात जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक व शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवार (२६ ऑगस्ट २०२५) रोजी पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन निवेदन सादर केले. मात्र, परिषद अध्यक्ष पालकर यांनी केवळ विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

संस्थाचालकांच्या मते परिषद विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी संबंधित खासगी कंपनीला पाठीशी घालत आहे. हा प्रकार थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतचा खेळ असून, त्यातून आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला.

न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढा उभारण्याचा तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या वेळी अॅड. स्वाती जाधव, शिला गवळी, रेखा चौरे, शीतल पवार, अॅड. विठ्ठल बडे, गिरमकर, अभिजीत भुतकर, जालिंदर चौरे, मनोहर काळे, अतुल ढवळे, दीपक घेवारी, प्रदीप नालकुल, संतोष गायकवाड, सुनिल चव्हाण, आकाश नगरे आदी संस्थाचालकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment