अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar social: भावंडांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक आगळ्या-वेगळ्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संस्थेच्या बहेनजींनी बंदीवानांना राख्या बांधल्या. राखी बांधताना अनेकांच्या डोळ्यांत आठवणींनी अश्रू दाटले, तर काहींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले.
हा कार्यक्रम अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) महाराष्ट्र राज्य, पुणे सुहास वारके, विशेष महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) महाराष्ट्र राज्य, पुणे योगेश देसाई आणि कारागृह उपमाहानिरीक्षक, नाशिक विभाग अरुणा मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यामध्ये ब्रह्मकुमारींच्या निर्मला दीदी, ॲड. निर्मला चौधरी, ज्ञानेश्वरी दीदी, मनीषा दीदी यांनी बंदीवानांसह कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. निर्मला दीदी यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे महत्त्व व मन:शांती राखण्याचे मार्गदर्शन केले. ॲड. निर्मला चौधरी यांनी बंदीवानांना कायदेविषयक माहिती देऊन त्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांबाबत जनजागृती केली.
कारागृहाचे संतोष कवार यांनी महाभारतातील द्रौपदी व श्रीकृष्ण यांच्या नात्याचा संदर्भ देत रक्षाबंधनाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व पटवून सांगितले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कारागृह कर्मचारी वसाहत परिसरात वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला. निर्मला दीदी आणि ॲड. निर्मला चौधरी यांच्या हस्ते पार पडलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला तुरुंगाधिकारी (श्रेणी-1) विजय सोळंके, तुरुंगाधिकारी (श्रेणी-2) अरुण मदने, हवालदार गणेश बेरड, सूर्यकांत ठोंबरे, नंदकुमार शिंदे, सुप्रभात दीदी, ॲड. पूजा ढोले पाटील, ॲड. शैलेश माघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.