शेवगाव | प्रतिनिधी
Ahilyanagar Crime: शासनाच्या योजनांमध्ये दिव्यांगांसाठी असलेले अनुदान बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल पाच जणांविरुद्ध दोन मंडळाधिकाऱ्यांनी शेवगाव पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
सायली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी २३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीत बोधेगावचे अविनाश बापू कदम, तर बाडगव्हाणचे अभिमन्यू रावसाहेब काजळे व शुभम वसंत काजळे या तिघांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले, असे नमूद होते. पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे कागदपत्रे दाखल केली असता प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय, शेवगाव मंडळाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीत प्रभाकर शामवेल बनकर व ज्योती प्रभाकर बनकर (रा. शेवगाव) यांच्याविरोधातही अशीच फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या सर्व पाच जणांविरोधात २६ ऑगस्ट रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शासकीय निधीचा अपहार करून खोट्या कागदपत्रांवर अनुदान मिळविण्याच्या या प्रकारामुळे खरीखुरी गरजूंना मिळणारा हक्क हिरावला जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
“दिव्यांगांसाठी शासनाकडून येणाऱ्या योजना व अनुदान हे खरंच पात्र असणाऱ्यांसाठी आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून शासनाला फसवणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. मिळालेले अनुदान परत वसूल केले जाईल व दोषींवर कठोर कारवाई होईल.”
— आकाश दहाडदे, तहसीलदार, शेवगाव