Ahilyanagar crime: पत्रकारास जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar crime, पत्रकार,

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar crime: पत्रकारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 13 ऑगस्ट) पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले.

शनिवार (ता. 9 ऑगस्ट) रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील राज चेंबर्स, कोठला येथे गणेश उरमुरे (रा. केडगाव) या व्यक्तीला बाबासाहेब बलभीम सानप (रा. वसंत टेकडी) याने लघुशंकेच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्रकार अन्सार सय्यद व त्यांच्या मुलाला सानप याने शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काही अनोळखी लोकांना एकत्र करून दहशत निर्माण केली आणि जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केले, असे निवेदनात नमूद आहे.

पत्रकार सय्यद यांना “पुढचा नंबर तुझाच” अशी थेट धमकी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिरीष कुलकर्णी, अण्णासाहेब नवथर, सुदाम देशमुख, सुभाष चिंधे, मिलिंद देखणे, सुधीर पवार, श्रीनिवास सामल, संजयकुमार पाठक, निलेश आगरकर, शुभम पाचरणे, संजय सावंत, स्वामी गोसावी, अन्सार सय्यद, शब्बीर सय्यद, उदय जोशी आदींसह पत्रकार, माध्यम प्रतिनिधी व वृत्तछायाचित्रकार उपस्थित होते.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

Leave a Comment