दारू, गांजा, हत्यारे आणि मुलींची छेडछाड; स्थानिक महिलांचा पोलिसांकडे तक्रारींचा पाढा
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Crime: डॉन बॉस्को परिसरात अल्पवयीन मुलांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, महिलांची आणि मुलींची छेडछाड, रात्रीच्या वेळी गोंधळ, तसेच समाजमंदिर परिसरातील गैरकृत्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महापालिकेने ख्रिस्ती बांधवांसाठी बांधलेल्या समाजमंदिराच्या आवारात डॉन बॉस्को आणि नागापूर भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीची अल्पवयीन मुले एकत्र येतात. ही टोळी दारू आणि गांजाचे सेवन करते, धारदार शस्त्रे बाळगते आणि रात्री अपरात्री गोंधळ घालते. परिणामी, नागरिकांना आपल्या मुलांना घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. विद्यार्थिनींना देखील त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी स्थानिक महिलांनी नोंदवल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे यांच्यासह महिलांनी पोलीस स्टेशनवर धाव घेतली.
बारस्कर म्हणाले, “ही मुले अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत गुंडगिरी करत आहेत. त्यांच्या पालकांनीही शिस्त लावणे आवश्यक आहे.”
त्यांनी महापालिकेकडे अंगरक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली.
डॉ. सागर बोरुडे यांनी सांगितले की, “महिलांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी व महापालिकेने परिसरात चांगली प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी.”
पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जात आहे. महिलांनी घाबरू नये. पोलीस सतत गस्त घालत असून, नागरिकांनी तक्रारी कळवाव्यात.”
तसेच त्यांनी पालकांनीही जबाबदारी स्वीकारावी, असे स्पष्ट केले.