मराठा आरक्षणाची या दिवशी होणार अधिवेशनात चर्चा मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( रत्नागिरी ) १०.१२.२०२३
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती दिली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. 


यावेळी बोलतांना उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे.  इम्पीरिकल डाटा गोळा करून आणि आयोगाला सांगून जमा झालेला इम्पीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणार आरक्षण आम्ही देणार असल्याचं, उदय सामंत यांनी सांगितले.


Leave a Comment