प्रतिनिधी ( छत्रपती संभाजीनगर ) १८.११.२०२३
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातल्या गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांचा फोटो अज्ञात इसमाने फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी येथील शिल्लेगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे ओ.बी.सी. एल्गार मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आरक्षणाचे बॅनर काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळेच बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र थेट भुजबळ यांचे एफआरमध्ये नाव आले असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अंदाजे दुपारी ०२:३० च्या सुमारास हा बॅनर फाडण्यात आला. तक्रारदारांचे मित्र पवन केरे यांनी फोनद्वारे बॅनर फाडल्याची माहिती त्यांना दिली. नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील आरापूर शिवारातील गवळी शिवरा कमानीजवळ मनोज जरांगे पाटील यांचा साखळी उपोषणाचा बॅनर फाडण्यात आला आहे. याची माहिती मिळताच बबनराव डुबे पाटील, संदीप जालींदर औताडे यांच्यासह दुपारी ०३:०० च्या सुमारास त्यांनी पाहणी केली. बॅनरवरील मनोज जरांगे पाटील आणि साखळी उपोषणाचा मजकूर फाडून बॅनरचे नुकसान केल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी शिल्लेगाव पोलिस स्थानकात येऊन तक्रार दाखल केली.
जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले. एवढच नाही तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे बॅनर काढून टाका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य जाहीर सभेत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतरच बॅनर फाडल्याचा दावा तक्रारदार संदीप भाऊसाहेब औताडे यांनी केला आहे. या सर्व प्रकारास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, जातीय सलोखा बिघडवणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.