सार्वजनिक सुविधा व मानसिकतेची थेट पडताळणी
अहमदनगर | 24 जून | प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, आणि ग्रामस्थांच्या मानसिकतेचा आढावा घेण्यात येणार आहे.
या तपासणीसाठी केंद्र शासनामार्फत त्रयस्थ संस्था प्रत्यक्ष गावांना भेट देणार असून ग्रामपंचायतींनी प्रत्येक स्तरावर तयारी ठेवावी, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.
गुणांकन प्रक्रिया व तपासणी निकष
- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन – 120 गुण
- ग्रामस्थांचा प्रतिसाद – 100 गुण
- सुविधांचा वापर – 240 गुण
- प्रत्यक्ष निरीक्षण – 540 गुण
पाहणीमध्ये लक्ष दिले जाणारे मुद्दे
- प्लास्टिक संकलन व त्याचे व्यवस्थापन
- खतखड्ड्यांचे प्रभावी व्यवस्थापन
- कुटुंब भेटीद्वारे माहिती संकलन
- वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर
- हात धुण्याच्या सवयींची अंमलबजावणी
- ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन कचरा कुंडींचा वापर
- नियमित कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थापन
- मैलागाळ उपसासाठी आवश्यक यंत्रणा व त्याचा दर्शनी उल्लेख
- धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठांची स्वच्छता
भविष्यातील स्वच्छता योजना आणि लोकसहभाग
ग्रामपंचायतींनी जर या सुविधा भविष्यात बचतगट किंवा अन्य संस्थांमार्फत शाश्वतपणे चालविण्याचे नियोजन केले असेल, तर त्यालाही गुणांकनात महत्त्व दिले जाईल.
तसेच, गावात “स्वच्छता संदेश”, सुजल संकल्पना आणि कचरा व्यवस्थापनातून महसूलनिर्मितीबाबत ग्रामस्थांना माहिती असणे अत्यावश्यक आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे वापराव्यात आणि स्वच्छतेसाठी सजग राहावे.