युवा कौशल्य सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा
अहमदनगर | प्रतिनिधी
Training for Women: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत संचालित जन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एकल महिला, बचत गटातील सदस्य महिला व युवतींसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
युवा कौशल्य सप्ताहानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरणही यावेळी करण्यात आले. या प्रसंगी जन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषाताई गुंजाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ, सहाय्यक आयुक्त रवीकुमार पंतम, संचालक बाळासाहेब पवार, विजय इंगळे, काशिनाथ गुंजाळ, पूजा देशमुख, अनघा बंदिष्टी, खलील हवालदार, ज्योती पगारे, प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, शुभदा पाठक आदी उपस्थित होते.
बैठकीत महिला व युवक-युवतींसाठी चालू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय भविष्यातील प्रशिक्षणाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात चर्चा झाली. उषाताई गुंजाळ, डॉ. खैरे व काशिनाथ गुंजाळ यांनी प्रशिक्षण केंद्रांना भेटी देत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ म्हणाले, “स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचे आणि व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.”
संचालक बाळासाहेब पवार यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक महिला व युवतींना जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण देण्यात आले आहे. कौशल्यक्षम शिक्षण हे सक्षम भारतासाठी आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
उषाताई गुंजाळ म्हणाल्या, “स्वतःच्या अस्तित्वासाठी उंबरठा ओलांडणाऱ्या महिलांना ही पहिली प्रेरणात्मक पायरी आहे. त्यांच्या अंगभूत कौशल्याला व्यावसायिक स्वरूप दिल्यास त्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधता येईल.”
युवा कौशल्य सप्ताहात रांगोळी, मेहंदी, निबंध, वक्तृत्व, हेअर कटिंग, मेकअप, फॅशन डिझायनिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या स्पर्धक महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
तसेच, स्वच्छता पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे, प्रशिक्षिका निलिमा बल्लाळ, ज्योती दिवटे, विजय बर्वे, उषा देठे आदींसह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.