अहमदनगर | प्रतिनिधी
social responsibility: मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक बाबुशेठ टायरवाले यांच्या वतीने महात्मा फुले वसतिगृह, लांडे थळ व सर्जेपुरा वस्ती येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने या उपक्रमांतर्गत तब्बल ५ हजार वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, “स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने शिकलेच पाहिजे. काही विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे आम्ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत असतो. समाजातील वंचितांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य हे समाजाचे कर्तव्य आहे. बाबुशेठ टायरवाले यांचे नगर शहराशी अतूट नाते आहे. त्यांनी कधीही राजकारण न करता, केवळ समाजकार्यावर भर दिला आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांतर्गत शालेय साहित्य वाटपाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थिनींनाही प्रोत्साहन दिले आहे.”
महेश लोंढे म्हणाले, “बाबुशेठ टायरवाले यांचा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे. ते शासकीय शाळांमध्ये जाऊन स्वतः विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करत असून गरजू कुटुंबांपर्यंत जाऊन मदत पोहोचवत आहेत.”
या उपक्रमात अशोक दहिफळे, पोपट पाथरे, आनंद शेळके, अॅड. पुष्पा येळवंडे, सुरेश क्षीरसागर, पांडुरंग घोरपडे आदी मान्यवर, तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक पोपट पाथरे यांनी केले तर आभार अॅड. पुष्पा येळवंडे यांनी मानले.