नगर तालुका | प्रतिनिधी
Ahilyanagar health camp: निमगाव वाघा येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, तर नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन देशाच्या ऐक्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, हॅपी हेल्दी कम्युनिटी, वैष्णवी ऑप्टीकल, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच उज्वला कापसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, ग्रामसेवक प्रविण पानसंबळ, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, तसेच अतुल फलके, केशव जगदाळे, रविंद्र काळोखे, डॉ. आकाश जरबंडी, डॉ. ओमकेश कोफ्लडा, मंदा साळवे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, दिपाली ठाणगे, तुकाराम पवार, स्वाती इथापे, निकिता रासकर, आप्पा कदम आणि प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विविध रोगांची तपासणी करून नागरिकांना संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय टीमने दिली.
सरदार पटेल जयंतीनिमित्त नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मंदा साळवे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली, तर विद्यार्थ्यांनी “एक भारत – श्रेष्ठ भारत” या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
पै. नाना डोंगरे म्हणाले, “देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता टिकविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी गृहमंत्री म्हणून अनेक संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.”
सामाजिक एकतेचा, राष्ट्रभक्तीचा आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास ‘मेरा युवा भारत’ चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आणि रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


