अहिल्यानगर | प्रतिनिधी
Sanjay Gandhi niradhar yojna: कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या ‘निराधार मित्र’ या मोबाईल ॲपमुळे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी अर्जस्थिती तपासणे आणि मंजुरी आदेश घरपोहोच मिळवणे आता अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा” ठरत आहे.
📲 डिजिटल प्रशासनाकडे वाटचाल
संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसाहाय्य योजना ही निराधार व गरजू नागरिकांसाठी जीवनदायी योजना असली तरी यापूर्वी अर्ज प्रक्रिया आणि मंजुरी संदर्भात अनेक अडचणी येत होत्या. अर्ज भरल्यानंतर स्थिती तपासण्याची सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना कार्यालयात वारंवार जावे लागत असे. मंजुरी आदेश वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत होत्या.
ही समस्या ओळखून तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘निराधार मित्र’ हे ॲप विकसित केले आहे.

🌟 सेवेची वैशिष्ट्ये
✅ आधार क्रमांकाच्या शेवटच्या ५ अंकांद्वारे अर्जस्थिती तपासता येते.
✅ अर्ज क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरूनही तपासणी शक्य.
✅ मंजूर आदेश मोबाईलवर थेट पाहता व डाउनलोड करता येतो.
✅ अर्ज नामंजूर झाल्यास कारणे आणि त्रुटी स्पष्ट दिसतात.
✅ वर्ष व महिन्यानुसार गावनिहाय मंजूर यादी पाहता येते.
✅ गावातील “निराधार मित्र” स्वयंसेवक लाभार्थ्यांना अर्ज तपासून देतात.
ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवणारी ठरत असून, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाची दिशा दाखवते.
🙋♂️ स्वयंसेवकांची भूमिका
ग्राम महसूल अधिकारी, पंचायत अधिकारी, महसूल सेवक तसेच इच्छुक स्वयंसेवक तरुणांना ॲपबाबत प्रशिक्षण देऊन संबंधित गावासाठी “निराधार मित्र” म्हणून नेमले जाणार आहे. हे स्वयंसेवक अर्ज तपासणे, आदेश मिळवून देणे व त्रुटी समजावून सांगणे अशी सेवा लाभार्थ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचवतील.
वृद्ध व निराधार अर्जदारांना कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. तसेच ग्राम महसूल अधिकारी पात्र लाभार्थ्यांचे मंजुरी आदेश पूर्वीप्रमाणेच घरपोहोच करतील.

तहसीलदार गुरु बिराजदार म्हणाले:
“या ॲपची निर्मिती करणारे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख आणि त्यांच्या शाखेतील सर्व अधिकारी-कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. लाभार्थ्यांच्या अभिप्रायानुसार ॲपमध्ये सातत्याने सुधारणा केली जाणार असून, सेवा अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवली जाईल.”
डॉ. मोहसिन शेख म्हणाले:
“ही सेवा केवळ कर्जतपुरती मर्यादित न राहता राज्यासाठी आदर्श ठरेल. डिजिटल सेवा प्रत्येक गावात पोहोचवून लाभार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
💬 लाभार्थ्यांचा प्रतिसाद
“आता अर्ज तपासणे आणि आदेश मिळवणे सोपे झाले आहे.”
“कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली.”
“त्रुटी समजल्याने अर्ज सुधारता येतो.”
🔰 राज्यभरासाठी नवा मानदंड
कर्जत तहसीलचा हा डिजिटल उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता असून, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांमध्ये डिजिटल प्रशासनाचा नवा मानदंड निर्माण करेल.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


