नगर तालुका | प्रतिनिधी
Politics: नगर तालुक्यातील बहुचर्चित शिंगवे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत सोसायटीच्या 81 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला चेअरमनपदी सुरेखा सुदाम जाधव व उपाध्यक्षपदी (व्हा. चेअरमन) सविता दत्तात्रय पाटील या दोन सख्ख्या बहिणींची बहुमताने निवड झाली.
सोसायटीवर महिला चेअरमन पदाची ही पहिलीच वेळ असून, दोन्ही सख्ख्या बहिणींची एकाच वेळी चेअरमन व उपाध्यक्ष म्हणून निवड होण्याची ही बहुधा जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
या निवडणुकीत संचालक मंडळाचे संतोष पवार, संतोष जाधव, रवींद्र जाधव, माणिक पुंड, सोन्याबापू बोरुडे, संजय खेमनर, तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ जाधव, माजी चेअरमन दत्तात्रय पाटील, प्रवीण जाधव, बाळासाहेब जाधव, इंद्रभान पुंड उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून ठोकळ मॅडम यांनी कामकाज पाहिले तर सचिव पाराजी मोरे यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी बोलताना नूतन चेअरमन सुरेखा जाधव व उपाध्यक्ष सविता पाटील म्हणाल्या,
“81 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांची चेअरमन व उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आम्ही सख्ख्या बहिणी आहोत आणि हा एक योगायोग आहे. महिलांना मिळालेला हा बहुमान योग्यरित्या पार पाडू. सर्वांना विश्वासात घेऊन सोसायटीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला प्राधान्य देऊ. विविध योजना राबवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार.”