समर्थक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत केले जल्लोषात स्वागत
नगरतालुका | प्रतिनिधी
Politics: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे बुधवारी, ता. ९ जुलै रोजी सरपंचपदासाठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत उज्वला सागर कापसे यांची बहुमताने सरपंचपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ग्रामस्थ व समर्थक सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
मागील महिन्यात तत्कालीन सरपंच लता अरुण फलके यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी निवड प्रक्रिया पार पडली. नेप्तीचे मंडळ अधिकारी प्रताप कळसे हे अध्यासी अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांना ग्राम महसूल अधिकारी विनायक दीक्षे व ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ यांनी सहकार्य केले.
सरपंचपदासाठी उज्वला सागर कापसे व सुजाता ज्ञानदेव कापसे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. दोन अर्ज आल्याने मतदान प्रक्रिया हात वर करून करण्यात आली. उपस्थित ९ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी उज्वला कापसे यांच्या बाजूने मतदान केल्याने त्या सरपंचपदी निवडून आल्या.
या निवडीवेळी उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, प्रमोद जाधव, मुन्नाबी शेख, दिपक गायकवाड, रुपाली जाधव, अलका गायकवाड आदी उपस्थित होते.
नूतन सरपंच उज्वला कापसे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल सोसायटीचे माजी चेअरमन अंशाबापू फलके, दूध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, सोसायटीचे चेअरमन बाळू जाधव, एकनाथ जाधव, जयराम जाधव, संतोष कापसे, अशोक कापसे, भिमराज कापसे, सिद्धेश्वर जाधव, मच्छिंद्र कापसे, अजय ठाणगे, बापू फलके आदींनी त्यांचे अभिनंदन केले.