पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवृत्ती देशासाठी शुभसंकेत- संजय राऊत
नवी दिल्ली | प्रतिनिधी
Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबरमध्ये( १७ सप्टेंबर ) ७५ वर्षांचे होत असून, त्यांच्या संभाव्य निवृत्तीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते म्हणजे थांबायचं असतं” असे विधान केले होते. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात, हे देशासाठी शुभसंकेत आहेत.”
पत्रकार परिषदेत राऊत यांना नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतील. त्यांची दाढी पिकली आहे, केस उडाले आहेत, जगभ्रमणही झाले. सत्तेची सर्व सुखं त्यांनी अनुभवली आहेत. आता त्यांना संघाकडून वारंवार सूचना येत आहेत की, निवृत्त व्हा आणि देश सुरक्षित हातात सोपवा.”
संजय राऊत पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ७५ वयानंतर पदावरून निवृत्त होण्याचा नियम आखला होता. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांच्यावरही हा नियम लादण्यात आला. आता तोच नियम स्वतः मोदींवर लागू होतोय. हाच नियम आता संघाकडून त्यांच्यावर लागू करण्याची वेळ आली आहे.”
राऊतांनी नानाजी देशमुख यांचं उदाहरण देत म्हटलं की, “निवृत्तीनंतर अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. नानाजींनी सामाजिक कार्य केलं, इतरांनीही आपापल्या भागात सेवा केली. त्यामुळे मोदी किंवा शाह यांचंही भविष्यात सामाजिक कार्यात योगदान द्यावं, ही देशासाठी चांगली बाब आहे.”
बातमीचा शेवट करताना राऊत म्हणाले, “या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येतात, हेच देशासाठी शुभसंकेत आहेत. यावर चर्चा होणं हीच एक सकारात्मक बाब आहे.”
राऊतांच्या या वक्तव्यामुळे मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात यावर अधिक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
2 thoughts on “Politics: नरेंद्र मोदींचा 75 वा वाढदिवस; भागवतांचे विधान आणि राऊतांचा टोला”