जालना | प्रतिनिधी
Maharashtra politics: महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जालना येथील माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या ‘५० खोके, एकदम ओके’ या वक्तव्याचे जनक गोरंट्याल यांनी यावेळी स्पष्ट केले की, उर्वरित काही वर्षे ते भाजपची सेवा करतील आणि जालना महापौर बनवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
गोरंट्याल म्हणाले, “काही दिवसांपासून मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. योग्य वेळ मिळत नव्हती, मात्र आज संधी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका येत आहेत. आमचे मित्र संजय केनेकर मला बऱ्याच दिवसांपासून पक्षात येण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे मी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.”
‘५० खोके, एकदम ओके’ विधानाने गाजलेले गोरंट्याल शिवसेनेतील फुटीनंतर गोरंट्याल यांनी दिलेल्या ‘५० खोके, एकदम ओके’ या वक्तव्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते. आता भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांनी सांगितले, “मला ऑपरेशन सिंदूरमधून प्रेरणा मिळाली. डीआरडीओने स्वदेशी सामर्थ्य दाखवले. मी पदासाठी नाही तर सेवेसाठी भाजपमध्ये आलो आहे.”
गोरंट्याल पुढे म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना देखील रावसाहेब दानवे आणि अतुल सावे माझे मित्र होते. पहिल्यांदा विधायक झालो तेव्हा माझे नाव मंत्रीपदासाठी यायला हवे होते. पण फक्त तिकीट देऊन उपयोग होत नाही, योग्य रणनीती झाली नाही. माझ्यासोबत आलेले कार्यकर्ते येथे आहेत, जे आले नाहीत त्यांना शुभेच्छा.”
कैलाश गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. तसेच, ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदारदेखील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडले होते.