मुंबई | प्रतिनिधी
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा ‘जनविश्वास सप्ताह’ म्हणून २२ जुलै ते ३० जुलैदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरात रक्तदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिक व महिलांची आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण अभियान, हरित महाराष्ट्र, ‘झाड माझी; सावली झाड माझी माऊली’ या संकल्पनांवर आधारित मोहिमा राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम गाव, तालुका व जिल्हा पातळीवर एकाच वेळी सुरु होणार आहेत.
यासोबतच युवा संकल्प शिबिरे, महिला सक्षमीकरणासाठी विशेष मेळावे, ‘अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार’, राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंथन सभा, ‘अजितदादा विकास प्रदर्शन’ आणि ‘राष्ट्रवादी संवाद यात्रा’ यांसारखे महत्त्वाचे उपक्रम देखील या जनविश्वास सप्ताहात पार पडणार आहेत.
सुनिल तटकरे म्हणाले की, “अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. त्यांच्यावरील जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि समाजाभिमुख कामाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या उपक्रमांमुळे पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडून येईल, तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.