नगर तालुका | प्रतिनिधी
Education: तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात ‘मेरा युवा भारत’ व श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक हबीब शेख, उपमुख्याध्यापक शिवाजी धस, शिक्षक संजय गोसावी, भरत लगड, सतीश मुसळे, रामदास साबळे, सुनीता दिघे, मनीषा वाटोळे, अशोक टकले आणि युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत हा युवकांचा देश असून, तरुणांमध्ये कौशल्यविकासाची जाणीव निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्य आत्मसात केल्यास युवक स्पर्धात्मक युगात यशस्वीपणे टिकू शकतात. केवळ पुस्तकी ज्ञान न चालता, व्यवसायक्षम कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. शासन विविध कौशल्य प्रशिक्षण योजना राबवत आहे, त्यांचा लाभ घ्यावा.”
उपमुख्याध्यापक शिवाजी धस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वावलंबन, उद्यमशीलता आणि रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य आवश्यक आहे. बदलत्या काळात पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा कौशल्याधारित रोजगार अधिक महत्त्वाचा ठरतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही कौशल्य शिक्षणाला विशेष स्थान देण्यात आले आहे. शालेय जीवनातच उपक्रम, कार्यशाळा, स्पर्धा यांद्वारे विविध कौशल्ये शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी साधावी. डिजिटल टूल्स, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब, स्किल इंडिया योजनेचा लाभ घ्यावा.”
मुख्याध्यापक हबीब शेख यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष व रमेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.