फलटण | प्रतिनिधी
Dr Sampada Munde SIT: फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून या पथकाच्या प्रमुखपदी मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाला तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तेजस्वी सातपुते या शेवगाव तालुक्यातील असून त्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आयपीएस पद मिळवले आहे. त्यांनी यापूर्वी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या त्या पुणे शहरात पोलिस उपयुक्त (DCP) म्हणून कार्यरत आहेत.
या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जात असल्याने राज्य सरकारने सातपुते यांच्या नेतृत्वाखालील अनुभवी अधिकार्यांच्या पथकावर विश्वास दाखवला आहे.

तेजस्वी सातपुते या २०१२ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांच्या ठाम निर्णयक्षमता, निष्पक्ष तपास आणि प्रामाणिकपणामुळे त्या ओळखल्या जातात.
या प्रकरणात एसआयटी लवकरच तपासाला सुरुवात करणार असून नागरिकांचे लक्ष या चौकशीवर लागले आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


