जॉर्जिया | प्रतिनिधी
Divya Deshmukh Champion: १९ वर्षीय महाराष्ट्रातील दिव्या देशमुखने अखेरच्या चालीत बुद्धिबळविश्वात इतिहास रचला आहे. फिडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्याने भारताच्या कोनेरू हंपीचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. यासह वर्ल्ड चेस कप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
दिव्या देशमुख व कोनेरू हंपी यांच्यात झालेल्या अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल फॉर्मेटचे सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे निकालासाठी टायब्रेकर खेळवण्यात आला. दोन्ही सामन्यांमध्ये 1-1 अशी बरोबरी राहिल्याने ट्रायब्रेकर निर्णायक ठरला.
रॅपिड फॉर्मेटमध्ये कोनेरू हंपीचा अनुभव अधिक होता, मात्र दिव्याने संयम राखत अप्रतिम खेळी करत हंपीला अचूक चालींचा फटका बसवला. तिने कोनेरूला चुका करण्यास भाग पाडले आणि ट्रायब्रेकरमध्ये एकतर्फी विजय मिळवला.
या विजयासह दिव्या देशमुखने भारताच्या बुद्धिबळ इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. कोनेरू हंपीसारख्या अनुभवी खेळाडूचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर संपूर्ण देशातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, दिव्याने ही यशस्वी मोहीम भारताच्या पहिल्या ग्रँडमास्टरविरुद्ध जिंकली.
दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक विजयाचे ठळक पैलू लक्षवेधी ठरले आहेत. ती वर्ल्ड चेस कप जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षीच दिव्याने जगाच्या पातळीवर ही मोठी कामगिरी साधली. अंतिम सामन्यात कोनेरू हंपीसारख्या अनुभवी खेळाडूविरुद्ध टायब्रेकरमध्ये तिने एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला. दिव्याने तिच्या चालींमधून कोनेरूला चूक करायला भाग पाडत सामन्याचा प्रवाह पूर्णपणे आपल्या बाजूला वळवला. या अभूतपूर्व यशानंतर सोशल मीडियावर देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण तिच्या या पराक्रमाचे कौतुक करत आहेत.
दिव्या देशमुखचा हा पराक्रम संपूर्ण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एक तरुणी म्हणून तिने साऱ्या जगाचे लक्ष बुद्धिबळाकडे पुन्हा वेधले आहे.