अहमदनगर | प्रतिनिधी
Cultural: त्र्यंबकेश्वर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेली श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पायी पालखी परतीच्या प्रवासात नगरमध्ये मुक्कामी थांबली. परतीचा प्रवास ता. १० जुलैपासून सुरू झाला असून, ही पालखी पायीच परत जात आहे. हि पालखी नगरमधील सिद्धीबाग येथे पोहोचली असता ठाणगे परिवारातर्फे उत्साहात स्वागत, पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी अंबादास ठाणगे, शरद ठाणगे, भरत ठाणगे, दिलीप पांढरे, राजू मामा जाधव, माजी नगरसेविका उषाताई शरद ठाणगे, निंबळक गावच्या सरपंच प्रियंका लामखडे, शंकरराव ठाणगे, शंकर विजय चितळे, शिवदत्त पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मंडळी उपस्थित होती.

पालखीचे दिंडीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, पुजारी जयंत महाराज गोसावी, अनिल महाराज गोसावी, मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, निवृत्ती चोपदार तसेच बैलजोडीचे आणि अश्वाचे मानकरी यांचाही या स्वागतात समावेश होता. यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
पालखी पूजनानंतर नालेगाव येथील ठाणगे मळ्यात सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या परंपरेचा पाया कै. नामदेवराव चिमाजी ठाणगे यांनी घातला होता. ते वयाच्या १७ व्या वर्षीपासून हे सेवाकार्य करत होते. १०३ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले नामदेवराव ठाणगे गेली ९० वर्षे ही सेवा अखंड करत होते. ही परंपरा आजही ठाणगे परिवाराने जपली असून, ती पुढेही सुरू राहणार असल्याचे शरद ठाणगे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “पूर्वी परतीच्या प्रवासात एक हजारांहून अधिक वारकरी असत. आता ही संख्या २०० ते ३०० पर्यंत कमी झाली आहे. तरीही आम्ही जाताना जसे स्वागत करतो, तसेच परतीलाही तितक्याच श्रद्धेने पूजा, स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करतो.”
दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी मनपातर्फे स्वच्छता व आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या. तसेच पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता.