Contaminated water issue: केडगावच्या प्रभाग क्रमांक १७ मधील लोंढे मळा परिसरात नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातून जाणारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन थेट स्थानिक ओढ्यामधून गेल्याने घरांमध्ये नळाद्वारे येणारे पाणी पूर्णतः घाण व मैलामिश्रित होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध पोटाचे विकार, उलट्या-जुलाबासारखे आजार होत असून लहान मुले व वृद्ध याला अधिक बळी पडत आहेत.
यासंदर्भात युवा नेते सुमित लोंढे यांनी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी भाजप मंडल अध्यक्ष भरत ठुबे, सुजय मोहिते, अजित कोतकर, अनिकेत निंबाळकर आदी उपस्थित होते.
सुमित लोंढे म्हणाले की, “लोंढे मळा परिसरात ओढ्यातून पाइपलाइन गेल्याने संपूर्ण पाणी दूषित होत आहे. पाईपलाइन पूर्णतः जीर्ण झाली असून ती तातडीने नवीन व इतर मार्गाने टाकावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
तसेच मोहिनीनगर, दुधसागर, कांबळे मळा, शास्त्रीनगर या भागांतील पाणीपुरवठाही सातत्याने विस्कळीत होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
या संदर्भात पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांनी लोंढे मळा परिसरातील पाइपलाइनचे तांत्रिक निरीक्षण करून ती ओढ्यातून हलवून उंची वाढवून दुसऱ्या मार्गाने नेण्याचे आश्वासन दिले. तसेच कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांत दुरुस्ती करून समस्या सोडवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.