Belgaum: शहापूर निवाऱ्याचे काम अधांतरी; भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ

Photo of author

By Dipak Shirsath

Belgaum, शहापूर

बेळगाव | श्रीकांत काकतीकर 

Belgaum: बेळगाव महानगरपालिकेची विकासकामे नेहमीच रखडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्मार्ट सिटी योजनेतून सुरू झालेली अनेक कामे अजूनही अपूर्ण आहेत. याच अनुषंगाने शहापूर स्मशानभूमीतील निवाऱ्याचे काम सुद्धा अर्धवट राहिले आहे, परिणामी नागरिकांना पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे.

तीन महिन्यांची मुदत, पण काम मात्र अधुरे

शहापूर स्मशानभूमीतील दोन निवाऱ्यांपैकी एक निवारा धोकादायक स्थितीत होता. त्याच्या दुरुस्तीसाठी 31.70 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. ठेकेदाराला दीड महिन्याची मुदत देण्यात आली होती, मात्र तीन महिने उलटूनही फक्त निवाऱ्याचे कामच पूर्ण झाले आहे. शेगड्या आणि चौथऱ्याचे काम अजूनही प्रलंबित आहे.

धोकादायक निवाऱ्यावर झाड कोसळले; आणखी हाल

नवीन निवाऱ्याच्या शेजारील जुन्या निवाऱ्यावर अलीकडेच झाड कोसळल्याने तो पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे सध्या एका निवाऱ्यात असलेल्या फक्त चार शेगड्यांवरच अंत्यविधी केले जात आहेत. इतरांना मात्र पावसात उघड्यावर शेगड्यांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

वडगाव स्मशानभूमीतील लाकडांची टंचाई

वडगाव स्मशानभूमीत लाकडांची टंचाई भासत असल्यामुळे वडगाव परिसरातील लोकांनाही शहापूर स्मशानभूमीकडे वळावे लागत आहे. परिणामी इथे दररोज 4 ते 6 अंत्यविधी होत आहेत, ज्यामुळे शेगड्या आणि निवाऱ्यांची कमतरता अधिकच जाणवत आहे.

महापौरांचा प्रयत्न, पण काम सुरू नाही

महापौर मंगेश पवार यांनी कोसळलेल्या निवाऱ्याच्या जागी नवीन निवाऱ्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीवर अंत्यविधी करताना अधिक लाकडांचा वापर होतो, ज्याचा खर्च नागरिकांच्या खिशाला झळ देतो.

तत्काळ दखल घेण्याची गरज

स्मशानभूमी हे एक संवेदनशील आणि आवश्यक सुविधा असलेले ठिकाण असून त्याच्या दुरवस्थेकडे महापालिकेने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहापूर स्मशानभूमीतील कोसळलेला निवारा तातडीने उभारण्यात यावा आणि इतर अपूर्ण कामेही तातडीने पूर्ण करण्यात यावीत.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Leave a Comment