अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) या देशव्यापी कामगार संघटनेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभर या ऐतिहासिक संघटनेचा गौरवदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अवतार मेहेर बाबा ट्रस्ट कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयटक कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेक्रेटरी ॲड. कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी संघटनेचा इतिहास आणि कामगार चळवळीतील योगदान विषद केले.
ते म्हणाले की, ३१ ऑक्टोबर १९२० रोजी या संघटनेची स्थापना झाली असून, लाला लजपतराय हे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर कॉ. गुरुदास गुप्ता, कॉ. ए. बी. बर्धन यांसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी संघटनेचे नेतृत्व केले. आज या संघटनेचे सदस्यसंख्या सुमारे १ कोटी आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातच आयटकने अनेक महत्त्वाचे कामगार कायदे लागू करून दिले. १९२३ मध्ये नुकसानभरपाई कायदा, १९४७ मध्ये अनुचित कामगार प्रथा कायदा, १९४८ मध्ये किमान वेतन कायदा, १९६५ मध्ये बोनस कायदा, तसेच १९७२ मध्ये ग्रॅज्युयटी कायदा लागू करण्यासाठी आयटकने निर्णायक भूमिका बजावली.
आजही आयटकच्या नेतृत्वाखाली असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आपले हक्क मिळविण्यासाठी लढा देत आहेत. नगर जिल्ह्यात आशा वर्कर, गटप्रवर्तक, ग्रामपंचायत कर्मचारी, लाल बावटा युनियन, पतसंस्था कर्मचारी, बिडी कामगार व मोलकरीण संघटना या सर्व संघटना आयटकच्या छत्राखाली कार्यरत आहेत.
कार्यक्रमात लाल बावटा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व अवतार मेहेर बाबा ट्रस्ट युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार यांनी आयटकने कामगारांसाठी मिळवून दिलेल्या विविध सवलतीबद्दल संघटनेचे आभार व्यक्त केले.
यावेळी सुभाष शिंदे, राम कोल्हापुरे, राजू मोरे, श्रीनाथ पाटोळे, शिवम शिंदे, सचिन मूळक आणि हरीश पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संघटनेचे सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


