अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar News: शिक्षण क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या व अनेक पिढ्या घडवलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी थेट पुढाकार घेत खासदार निलेश लंके तब्बल 200 पेन्शनर शिक्षकांसह दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शनिवारी, ता. 19 जुलै रोजी रेल्वेने दिल्लीकडे प्रस्थान ठेवलेल्या या दौऱ्याचा उद्देश केवळ मागण्या मांडणेच नव्हे, तर शिक्षकांना राजधानीतील ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडवणे हाही आहे.
नगर शहरातील रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत मोठी उपस्थिती होती. यावेळी शिक्षक द. मा. ठुबे, बन्सी उबाळे, ज्ञानदेव लंके, विनायक कोल्हे, अशोकराव बागुल, महादेव गांगर्डे, सूर्यभान काळे, किशोर हार्दे, अशोक धसाळ, दत्तात्रय गावडे, गजानन ढवळे, प्रदीप खिलारी, पोपट इथापे, बाळासाहेब लगड, अनिल नलगे, मोहन पवार यांच्यासह तालुकास्तरावरील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यात शिक्षकांच्या निवृत्तीनंतरच्या पेन्शन, वेतनवाढीतील विसंगती, वैद्यकीय सुविधा अशा विविध गंभीर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे थेट पाठपुरावा करण्यात येणार आहे. याशिवाय संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि इतर प्रेक्षणीय स्थळांची सफरही नियोजित आहे.
खासदार निलेश लंके म्हणाले, “शिक्षक पिढ्या घडवतात. त्यांचे प्रश्न सोडविणे ही सामाजिक जबाबदारी आहे. माझ्या वडिलांचेही योगदान शिक्षक म्हणूनच आहे. त्यामुळे शिक्षक हा विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. सेवानिवृत्त शिक्षकांचा दिल्ली दौरा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल.”
शिक्षक बन्सी उबाळे म्हणाले, “खासदार लंके यांनी एका शिक्षकपुत्राची भूमिका बजावत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान केला आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.” तर द. मा. ठुबे यांनी सांगितले की, “खासदार लंके यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत दिल्लीच्या दरबारात शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्वांना घेऊन गेले आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे सर्व माजी शिक्षक भारावले आहेत.”
या दौऱ्यात शिक्षकांसाठी प्रवास, निवास, भोजन व दिल्ली दर्शनाची संपूर्ण व्यवस्था खासदार लंके यांच्या वतीने करण्यात आली आहे. बहुतेक शिक्षक पहिल्यांदाच दिल्लीला जात असल्याने या संधीमुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.