अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar: आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास आणि कुटुंबाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला असून काही विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक त्यांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदन देऊन संरक्षणाची मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की, “आ. संग्राम जगताप हे हिंदू धर्मप्रसारासाठी विविध ठिकाणी सभा, मोर्चे व आरत्या घेत असतात. अशा कार्यक्रमांदरम्यान, काही ठिकाणी दोन धर्मांमध्ये वाद असलेल्या मंदिरांमध्ये देखील ते जातात. यामुळे काही लोकांकडून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. माध्यमांवरही त्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आली असून ‘गर्दीतून गोळी मारू’ असे उघड धमकीवजा शब्द वापरण्यात आले आहेत.”
त्यासोबतच आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर “२ दिन के अंदर संग्राम को खत्म करूंगा” असा धमकीचा मजकूर अनोळखी क्रमांकावरून पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या निवेदनावर प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशाताई निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दिपक खेडकर, रेश्मा आठरे, सागर बोरुडे, साधनाताई बोरुडे, मयुर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, महेश गलांडे, अंजली आव्हाड, धीरज उकिर्डे, मारुती पवार, सुंदा शिरवळे आदी पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, “धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन अटक केली जाईल. याशिवाय शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डांवर महापालिकेने कारवाई करावी, यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करेल.”