अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Womens Conference: सन १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची घोषणा केली होती. २०२५ मध्ये या घोषणेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत स्त्रियांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. स्त्रियांच्या चळवळीमुळे कायदे बदलले, सरकारी धोरणांमध्ये सुधारणा झाली आणि सामाजिक दृष्टिकोन बदलला. या सर्व बदलांचा मागोवा घेण्यासाठी तसेच पुढील काळातील स्त्री चळवळीची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद हा मंच स्थापन केला आहे. या मंचाच्या वतीने वर्षभर महाराष्ट्रभर विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि संघटनांनी एकत्र येऊन अहमदनगर जिल्हा स्त्रीमुक्ती परिषद या मंचा मार्फत स्त्री प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक वाहतुकीतील स्त्रियांसंबंधी सुरक्षा अभ्यास जिल्ह्यातील स्त्री कार्यकर्त्यांनी केला आहे.
रविवार, ता. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्ह्यातील महिलांची परिषद अहमदनगर जिल्हा स्त्रीमुक्ती परिषद आणि ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या विद्यमाने सीएसआरडी सभागृहात सकाळी १० ते दुपारी ५ या वेळामध्ये आयोजित केली जाणार आहे.
परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य सुरेश पठारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या साथी ॲड. निशा शिवूरकर असणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत गेल्या पन्नास वर्षातील स्त्री चळवळीचा आढावा, महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या विविध मोहिमा, पुढील कार्यक्रम, भारतीय संविधानासमोरील आक्रमक राष्ट्रवादाचे आव्हान, अहमदनगर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा प्रश्न, स्त्रियांवरील हिंसेचे विविध पैलू इत्यादी विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या साथी डॉ. मनीषा गुप्ते, कॉम्रेड लता भिसे, साथी रमेश अवस्थी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातून परिषदेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व महिला संघटना व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नीलिमा जाधव बंडेलू, कॉम्रेड स्मिता पानसरे, संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, सरोज आल्हाट, मदिना शेख, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे यांनी केले आहे.
संपर्क: संध्या मेढे – 77099 85555
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


