मल्लखांब, तलवारबाजी, एरियल एरोबिक्सच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली मने
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Sports: खेळांविषयी जागृती निर्माण व्हावी आणि क्रीडा संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरात शुक्रवारी ता. 29 ऑगस्ट भव्य क्रीडा रॅली काढण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलंपिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली पार पडली.
यामध्ये हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला. पावसाच्या रिमझिम सरीत मल्लखांब, रोप मल्लखांब, तलवारबाजी, लाठी-काठी, दांडपट्टा, एरियल एरोबिक्स, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, स्केटिंग, कराटे, आर्चरी आदी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर झाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर करताच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने गर्दी केली. लेझीम, झांज आणि ढोल पथकामुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण रंगले होते.
रॅलीचा प्रारंभ जुने बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज व हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन झाले.
समारोपीय कार्यक्रम वाडियापार्क क्रीडा संकुल येथे पार पडला. येथे पुन्हा एकदा रोप मल्लखांब व तलवारीसह खांब मल्लखांबाचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही रंगले.
कार्यक्रमास जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी दरेकर, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.
या वेळी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रताप दराडे यांच्या हस्ते रावसाहेब बाबर, संजय धोपावकर, होनाजी गोडळकर, अनिल म्हस्के, सुरेश बनसोडे, संजय इस्सार आणि माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांना गौरवण्यात आले.
सूत्रसंचालन शैलेश गवळी व रावसाहेब बाबर यांनी केले, तर आभार भाऊराव वीर यांनी मानले.