Ahilyanagar Sports: हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे गिर्यारोहकांसाठी नेहमीच धाडसाचे आव्हान ठरतात. तीव्र चढाई, विरळ प्राणवायू, अत्यल्प तापमान आणि सतत बदलणारे हवामान यामुळे ही मोहीम अधिक कठीण बनते. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत, अहिल्यानगर येथील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक अक्षय भापकर यांनी तब्बल 19,951 फूट (6,081 मीटर) उंचीचे माऊंट शिनकुनयशस्वीरित्या सर केले. त्यांच्या या कामगिरीने नगर जिल्ह्याचे नाव अभिमानाने उजळले आहे.
या मोहिमेसाठी भापकर यांनी तांत्रिक गिर्यारोहणाचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. सह्याद्रीत वजनासह डोंगर चढणे, नियमित धावणे, कठोर शारीरिक तयारी या सर्व गोष्टींचा भाग होता. याआधी त्यांनी माऊंट युनाम (6,111 मीटर) शिखरही सर केले होते.
ही मोहिम 20 जुलै 2025 रोजी झंस्कार-जिस्पा येथून सुरू झाली. 22 जुलैला पथक बेस कॅम्पवर पोहोचले. 25 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गिर्यारोहकांनी माऊंट शिनकुन शिखरावर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला.
या मोहिमेच्या पथकात अक्षय भापकर यांच्यासह अंकित सोहोनी, कुशल मासाळ, आनंद चिनूरकर, संपत मालू, नमिता शेळके, डॉ. सुनीता राठी आणि गिर्यारोहण संघाचे प्रमुख डॉ. सुमित मांदळे यांचा समावेश होता.
माऊंट शिनकुन हे लाहौल-स्पीती व जम्मू-काश्मीरच्या सीमेवर वसलेले असून, तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण समजले जाते. या मोहिमेदरम्यान पथकाने पूर्वेकडील कठीण बाजूने चढाई करत हे शिखर सर केले, अशी माहिती डॉ. मांदळे यांनी दिली.
अक्षय भापकर यांच्या या यशाबद्दल ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे रविंद्र चोभे, अमित सोनग्रा व आकाश पातकळ यांनी त्यांचा सत्कार केला. भापकर यांची ही कामगिरी स्थानिक गिर्यारोहकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.