अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar social: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली तर्फे ‘भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश कृष्णा सोनवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गावातील नवनाथ विद्यालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. सुनील मुंदडा, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भक्ती शिरसाठ, आशा गोंधळे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती मोहिमा, वाचनालय चळवळ व वाचन संस्कार अभियान, तसेच काव्यसंमेलन व साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून त्यांनी शाळा आणि गावपातळीवर वाचनालये सुरू केली असून नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर केला आहे.
यावेळी न्यायाधीश कृष्णा सोनवणे यांनी पै. डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पै. डोंगरे यांनी सांगितले की, “निमगाव वाघा ग्रामस्थांच्या पाठबळामुळेच हे सर्व कार्य शक्य झाले आहे. मिळणारा सन्मान हा माझ्यासह प्रत्येक ग्रामस्थाचा आहे.”
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


