अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar social: महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठावंत सेवेला सलाम करत सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख आणि भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांना ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, आणि नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
पै. डोंगरे म्हणाले, “आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. पोलीस दलात कार्य करणे म्हणजे गुन्हेगारीविरुद्ध लढा देणेच नव्हे, तर समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवणे होय.
खाकी वर्दी परिधान करून लोकांच्या सुरक्षिततेसाठी, न्याय मिळवून देण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिला जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्या नवदुर्गा ठरतात.”
सन्मानाला उत्तर देताना पल्लवी उंबरहंडे-देशमुख आणि प्रियंका आठरे म्हणाल्या, “आमच्यासाठी खाकी वर्दी ही केवळ पोशाख नसून ती जनतेच्या सुरक्षेचे व सेवेचे प्रतीक आहे.

कार्यात धोका, दडपण आणि भावनिक प्रसंग असले तरी आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असतो.
अशा सन्मानाने अधिक प्रेरणा मिळते आणि चांगले काम करण्याची उमेद वाढते.”
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा



