नगर तालुका | प्रतिनिधी
Ahilyanagar public issue: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या खातगाव–इसळक रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ए. बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. खातगाव–इसळक हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला असून, अपूर्ण कामामुळे नागरिकांना रस्त्याचा वापर करता येत नाही.या रस्त्याचा उपयोग खातगाव, टाकळी, हिंगणगाव, कर्जुने खारे, निमगाव घाणा परिसरातील शेतकरी, कामगार, दूध उत्पादक व विद्यार्थी करतात.
काम करताना संबंधित अधिकारी वर्गाने अत्यंत बेजबाबदार पद्धतीने साईट ठरवल्या असून,
इसळककडून 3.700 ते 4.500 दरम्यान 700 मीटर रस्ता अर्धवट सोडला आहे. निधी कमी असल्यास काम कुठून सुरु करावे व कुठे समाप्त करावे याची नियोजनबद्ध पाहणी करणे गरजेचे होते; मात्र ते करण्यात आले नाही. यामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या संदर्भात मागील वर्षापासून वारंवार तक्रारी व पाठपुरावा करण्यात आला असला तरी संबंधित यंत्रणेकडून आजपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही. सध्या या रस्त्याची जबाबदारी कोणताच विभाग घेण्यास तयार नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
“जर रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागले नाही, तर मंगळवार, ता. 14 ऑक्टोबर 2025 रोजी संबंधित कार्यालयात आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
या वेळी देविदास कुलट, निलेश सातपुते, नानासाहेब काळे, देवा ढगे, मधुकर सातपुते, रामदास फुले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


