शेवगाव | प्रतिनिधी
Ahilyanagar politics: राज्य सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचे जाहीर केले होते. मात्र, कालपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात एक पैसादेखील जमा न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.
सणासाठी काही आर्थिक मदत मिळेल या आशेने अनेक शेतकरी दिवसभर बँकेच्या दारात ताटकळत होते; परंतु त्यांना घोर निराशा सहन करावी लागली. या पार्श्वभूमीवर शेवगाव येथे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली बसस्टँड चौकात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नेत्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “सरकारने केवळ घोषणा केल्या, परंतु अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयादेखील जमा केले नाही. ऐन दिवाळीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.”

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, कॉ. संदीप इथापे, बबनराव पवार, अंजाबापू गायकवाड, विष्णू गोरे, राम डाके, बाबुलाल सय्यद, राम लांडे, कानिफनाथ कर्डिले, रमेश पाटील, संदीप माने, राहुल वरे, शंकर देवढे, महादेव बडे आदी प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


