शेवगाव | प्रतिनिधी
Ahilyanagar politics: शेवगाव येथील सामनगाव मध्ये आज अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभाच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणांनी आपला रोष आणि वेदना व्यक्त करत प्रति हेक्टर ७० हजार मदतनिधी मिळण्याची आग्रही मागणी केली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सरकारी आकडेवारी २७ लाख हेक्टर शेती बाधित झाल्याचे दाखवते, पण प्रत्यक्षात ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. उभी पिके वाहून गेली, शेती जमीन वाहून गेली, जनावरांचे मृत्यू झाले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

पंजाबसारख्या लहान राज्याने त्यांच्या राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून संवेदनशीलतेचे उदाहरण दाखवले. पण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मात्र भाजप सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.
कोरडवाहूसाठी केवळ ८५०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार आणि फळबागांसाठी ३२ हजार रुपये अशी तुटपुंजी मदत घोषित करून सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. “ही मदत नव्हे तर थट्टा आहे! विमा कंपन्यांच्या हितासाठी सरकारने शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनवले आहे,” असा संतप्त आरोप कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी आंदोलनस्थळी केला.

ते म्हणाले, “सरकारने केवळ साडे सतरा हजार रुपये हेक्टरी भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी मरतो, पण विमा कंपन्या आणि कॉर्पोरेट घराणी मात्र सरकारच्या कृपादृष्टीने अब्जावधी कमावतात. या सरकारला धडा शिकविल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही.”
या आंदोलनावेळी सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ७० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, फळबाग, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू आणि पूरक उद्योगांचे नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशा मागण्या करण्यात आल्यात.

मागण्यांचे निवेदन सहाय्यक कृषी अधिकारी अमोल राऊत यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारले.
आंदोलनात ॲड. सुभाष लांडे, बबनराव पवार, संदीप इथापे, बापुराव राशीनकर, ॲड. भगचंद उकिरडे, राम लांडे, सरपंच आदिनाथ कापरे, गोरक्षनाथ काकडे, रमेश पाटील कापरे, ॲड लक्ष्मण बोरुडे, विष्णू गोरे, भिवसेन घोरपडे, अंजाबापू गायकवाड, सुदाम झाडे, सुभाष कोठे, अंकुश नजन, दत्तात्रय नजन, देवदान कांबळे, अजित नजन, अरुण काळे, शिवाजी अर्जुन, मुकेश सातपुते, बाबासाहेब जाधव, दादा नजन, भाऊसाहेब काकडे, अक्षय घोर, हरिभाऊ काळे, किरण काळे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


