अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar politics: नगर तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदांच्या वारंवार फेरबदलांमुळे लोकशाहीची थट्टा होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच डॉ. दीपक जाधव यांनी केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत दोन सरपंच आणि तीन उपसरपंचांची निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ केवळ पाच महिने शिल्लक असताना सत्ताधाऱ्यांनी गावातील प्रलंबित विकासकामांकडे पाठ फिरवून केवळ बोर्डावर नाव लावण्याची स्पर्धा सुरू केल्याचा आरोप डॉ. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
डॉ. जाधव म्हणाले, “जर प्रत्येक महिन्याला सरपंच आणि उपसरपंच बदलत राहिले, तर गावाचा विकास कधी आणि कसा होणार? प्रशासनाने अशा निवडींना मान्यता देणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
भविष्यात अशी परिस्थिती टाळायची असल्यास दोन निवडींमध्ये किमान सहा महिन्यांचा कालावधी बंधनकारक करावा आणि त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा गावपातळीवर घोडेबाजार सुरू होण्याची भीती असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गावातील अनेक विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की —
गावचा मुख्य रस्ता अद्यापही प्रलंबित आहे.
उड्डाणपूल बाधित शेतकऱ्यांना गेल्या २५ वर्षांपासून मोबदला मिळालेला नाही.
अतिक्रमण, भुयारी मार्ग व जलउदंचन केंद्राचे कनेक्शन प्रलंबित आहे.
आठवडे बाजाराच्या अडचणींवर अद्याप उपाय झालेला नाही.
ही सर्व कामे दुर्लक्षित ठेवून काही मंडळी केवळ सत्तेचा आणि पदाचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गावात अलीकडे जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले. दलित उपसरपंचावर अविश्वास ठराव, दलित मुख्याध्यापकाचे निलंबन, दलित ग्रामसेवकाची बदली आणि मांगिरबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला विरोध अशा घटनांद्वारे गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप डॉ. जाधव यांनी केला.
सध्या ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय एकत्र सत्ता असल्याने विरोधक अस्तित्वात नाहीत. त्याचाच गैरफायदा घेत काही मंडळी गावातील वातावरण बिघडवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देहरेतील नागरिक आता या स्वार्थी राजकारणाला कंटाळले असून, गावातील तरुण आणि सुशिक्षित मतदार सक्षम तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत खऱ्या अर्थाने विकासाभिमुख आणि पारदर्शक नेतृत्व पुढे यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


