पारनेर | प्रतिनिधी
Ahilyanagar News: पारनेर तालुक्यातील निघोज येथे मागील तीन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या १५ कुटुंबांना ग्रामसभेतून उठविण्याचा ठराव करण्यात आल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून न्यायाची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, युवक आघाडीचे योगेश गुंजाळ, विजय काळे तसेच मदारी समाजातील हुसेन मदारी, रोशन मदारी, सलीम मदारी, उस्मान मदारी, चिराग मदारी, बशीर मदारी, नसीर मदारी, राजू मदारी, बरकत मदारी यांसह कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की, मदारी समाज पारंपरिक व्यवसाय करीत असून, साप खेळवणे, जादूचे खेळ दाखवणे, जुन्या कपड्यांची विक्री आदी कामांमधून उपजीविका चालवली जात होती. मात्र, अलीकडील काळात वनविभागाचे नियम व जादूटोणा विरोधी कायद्यामुळे त्यांचा पारंपरिक व्यवसाय थांबला आहे. सद्यस्थितीत या समाजातील लोक भंगार गोळा करणे, स्टिकर व खेळणी विक्री यावर उपजीविका चालवतात.
मदारी समाजातील हे कुटुंब निघोज येथे अंदाजे चार ते पाच एकर शासकीय जमिनीवर झोपड्या करून राहत आहे. मात्र, शेजारील रहिवासी निलेश भुकन या व्यक्तीकडून सातत्याने त्रास दिला जात असून, त्यांच्या शेळीची चोरी, गोठा जळाल्याची खोटी तक्रार पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेऊन या कुटुंबांना गावातून हाकलण्याचा ठराव करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण गावात या समाजाने कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा गुन्हा केलेला नाही. मात्र, शेजारील एकच व्यक्ती मुद्दाम जातीय तेढ निर्माण करत आहे. गोपनीय चौकशीद्वारे सत्य समोर आणावे आणि जर दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
अन्यथा येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.