Ahilyanagar literature: निंबळक येथे रंगला लेखक-वाचक संवाद; आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या उपक्रमास साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar literature, निंबळक,

नगर तालुका | प्रतिनिधी

Ahilyanagar literature: तालुक्यातील निंबळक येथील आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी ५ वा. लेखक आणि वाचक संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चर्चासत्रात ग्रामीण साहित्यिक आणि ‘शून्यातून शून्याकडे‘ या कादंबरीचे लेखक रामदास कोतकर यांनी वाचकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी कादंबरीची पार्श्वभूमी आणि लेखनामागील प्रेरणा उपस्थितांपुढे मांडली. यावेळी लेखक व उद्योजक सचिन चोभे, बाळासाहेब माधव कोतकर, ॲड. राहुल ठाणगे आणि भानुदास कोतकर यांनी कादंबरीवरील आपले अभिप्राय व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात कवी बलभीम निमसे आणि बाळासाहेब कोतकर गुरुजी यांच्या कविता वाचनाने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली. लेखक–वाचक कट्ट्याद्वारे ग्रामीण साहित्यिक आणि वाचक यामध्ये संवाद वाढेल तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असे मत सचिन चोभे यांनी व्यक्त केले.

यावेळी माधुरी चोभे, राजेंद्र खुंटाळे, प्रा. डॉ. अशोक घोरपडे, दिलीप कोतकर, बाळासाहेब खपके, दादासाहेब वाघ यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष महादेव गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वाचक कट्ट्यावर सहभागी होण्यासाठी आवाहन…

वाचक कट्ट्याद्वारे नियमितपणे नवलेखक व कवींना मार्गदर्शन मिळावे आणि साहित्यिक गप्पा मारता याव्यात, यासाठी मास्टरमाईंड करिअर अकॅडमीच्या हॉलमध्ये अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोड येथे महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत वाचक कट्टा आयोजित केला जाईल. सहभागी होण्यासाठी ॲड. राहुल ठाणगे (७०४०१ ४४३४१) या क्रमांकावर नाव व थोडक्यात परिचय पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष महादेव गवळी यांनी केले.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment