माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार

अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Get-together: स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या श्री खंडेश्वर विद्यालय, दैठणे गुंजाळ येथे सन २००२-०३ या शैक्षणिक वर्षातील दहावी (अ) तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळा शुक्रवार, ता. २४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. तब्बल २२ वर्षांनी जुने सहाध्यायी आणि शिक्षक पुन्हा एकत्र आले, तेव्हा शाळेची घंटा जणू पुन्हा वाजल्यागत प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांनी या गेट-टुगेदरची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रंगीबेरंगी रांगोळ्या, जयघोष आणि फुलांच्या पायघड्यांमध्ये शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेच्या ओळींनी संपूर्ण वर्ग आठवणींनी उजळला आणि अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यानच्या काळात दिवंगत झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण दारकुंडे, तसेच संपत येणारे, महेश जाधव, संभाजी पानमंद, बाबा जासूद, राधाकृष्ण मगर, काशिनाथ महांडूळे, कानिफनाथ गुंजाळ या शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना विवेकानंद जीवनावर आधारित ध्यानपुस्तक, सन्मानचिन्ह आणि रोपटे भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

माजी मुख्याध्यापक दारकुंडे सर भावुक होत म्हणाले, “शिक्षक-विद्यार्थी नाते हे आयुष्यभर टिकणारे असते. भविष्यातही असे उपक्रम होत राहावेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील यशाचे कौतुक करत, “या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी आमचा अभिमान आहे,” असे सांगितले.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. बापू गुंजाळ यांनी ‘आई’ या विषयावर हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर समीर गुंजाळ यांनी रंगतदार लावणी सादर केली. विद्यार्थिनी गीतांजली येवले आणि इतर सहाध्यायांनी आठवणी, अनुभव आणि जोक्स शेअर करत कार्यक्रमाला रंगत आणली.

शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात लावण्यासाठी चिकू, पेरू आणि विविध फळझाडे भेट दिली, तसेच शाळेसाठी १० सीलिंग फॅन देण्याची घोषणा केली. अहिल्यानगरसह नाशिक, मुंबई, पुणे, शिरूर आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वित्त व लेखा अधिकारी महेश कावरे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. बाळू गुंजाळ यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तैवान पिंक पेरूचे रोप भेट दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गुंजाळ, प्रास्ताविक बापू गुंजाळ, प्रमुख पाहुण्यांची ओळख सतीश येवले, अध्यक्षपदाची निवड अरुणा येवले, तर आभार प्रदर्शन स्मिता केदार यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता “पसायदान”ने झाली. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प घेतला.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

